पाटणा : गेल्या 30 वर्षांपासून बिहारमध्ये लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांचे सरकार होते, परंतु असे असतानाही बिहार आज इतर राज्यांच्या तुलनेत देशातील सर्वात मागास आणि गरीब राज्य आहे, असे म्हणत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आज नव्या पक्षाची घोषणा करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
आता बिहारमध्ये नवीन विचार आणि नवीन प्रयत्नांची गरज आहे. याठिकाणी सामाजिक न्यायाची बाब मागे पडली आहे. बिहार विकासाच्या बाबतीत सर्वात खालच्या स्तरावर आहे. हे सत्य कोण नाकारू शकत नाही. जर पुढील १०-१५ वर्षांत बिहारला आघाडीवर असलेल्या राज्यांच्या यादीत यायचे असेल तर नवीन विचार आणि नवीन प्रयत्नांची गरज आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
कोणीही नवीन विचार आणि नवीन प्रयत्न करू शकत नाही, असे माझे मत आहे. जोपर्यंत बिहारचे सर्व लोक प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत बिहारचे कल्याण होऊ शकत नाही. मी आज कोणत्याही पक्षाची किंवा राजकीय पक्षाची घोषणा करणार नाही. येत्या तीन ते चार महिन्यांत सार्वजनिक स्वावलंबनाचा विचार असलेल्या जवळपास १८ हजार लोकांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
याचबरोबर, जवळपास ९० टक्के लोक या मुद्द्यावर सहमत आहेत की नवीन विचार आणि नवीन प्रयत्नांची गरज आहे. मी आता १८ हजार लोकांशी चर्चा करणार आहे आणि या सर्वांना भागिदार बनवण्याचे माझे लक्ष्य आहे. हे सर्व एकत्र आले आणि या सर्वांनी नवीन पार्टी तयार करण्यासाठी सहमती दिली तर एका नवीन पार्टीची घोषणा केली जाईल, असेही प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.