गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचे काय होणार? प्रशांत किशोर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:32 PM2022-05-20T15:32:19+5:302022-05-20T15:33:42+5:30
prashant kishor : प्रशांत किशोर यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही अनेकदा भेट घेतली होती.
नवी दिल्ली : राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसने तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. ज्यामध्ये पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी सहभाग घेऊन आपली मते मांडली, तसेच आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसच्या या चिंतन शिबिराची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी खिल्ली उडवली आहे. काँग्रेसचे चिंतन शिबिर काहीही सार्थक करण्यात अपयशी ठरले आहे. इतकेच नाही तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. "काँग्रेसच्या चिंतन शिबिरावर माझे काय मत आहे, असे मला सतत विचारले जात होते. मला वाटते की हे चिंतन शिबिर काहीही सार्थक करण्यात अपयशी ठरले आहे. हे केवळ यथास्थिती वाढवणे आणि काँग्रेस नेतृत्वाला वेळ देणे, याशिवाय दुसरे काही नाही... कमीत कमी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या पराभवापर्यंत..."
I’ve been repeatedly asked to comment on the outcome of #UdaipurChintanShivir
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 20, 2022
In my view, it failed to achieve anything meaningful other than prolonging the status-quo and giving some time to the #Congress leadership, at least till the impending electoral rout in Gujarat and HP!
काँग्रेसची ऑफर फेटाळली होती
दरम्यान, याआधी प्रशांत किशोर यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही अनेकदा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला अनेक सूचना दिल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण काँग्रेससोबत प्रशांत किशोर गेले नाहीत. या चर्चानंतर काही दिवसांनी प्रशांत किशोर यांनीच आपण काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी काँग्रेसला सल्ला देताना ते म्हणाले की, काँग्रेसला माझ्या जागी खंबीर नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे.