Prashant Kishor: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रीय झाले आहेत. ३५०० किमी अंतर १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणाऱ्या या यात्रेची सांगता ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा आता कर्नाटकात पोहोचणार आहे. यातच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या यात्रेवर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांना एक सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून नेतृत्व करण्याची ऑफर नाकारली होती. दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी प्रशांत किशोर यांनी कंबर कसली असून, आता विदर्भाला देशातील नवे राज्य करण्यासाठी प्रशांत किशोर सक्रीय झाले आहेत. यातच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट भाष्य केले आहे.
भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती
काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुजरात किंवा भाजपशासित इतर कोणत्याही राज्यातून सुरू व्हायला हवी होती. काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू करायला हवी होती. कारण येथे या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर हे या निवडणुकीत आपला अर्ज दाखल करू शकतात. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, असा ठराव एकमताने मंजूर केला आहे.