येणाऱ्या काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे, तर मध्य प्रदेशात भाजप आणि तेलंगणामध्ये बीआरएस सत्तेवर आहे. या राज्यांमध्ये केव्हाही विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो. मात्र, यातच संसदेचे विशेष अधिवेशनही बोलावण्यात आल्याने, आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा होत असली तरी, यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक वेळेवरही होऊ शकते.
या विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना जन सूरज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (PK) यांनीही आपला अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी पीके यांनी काँग्रेस, भाजप आणि टीएमसीसह इतरही काही पक्षांना निवडणुकीत मदत केली आहे. 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांना आगामी काळात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील जय-पराजयासंदर्भात विचारले असता, त्यांनी कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर आहे अथवा वरचढ ठरू शकतो यासंदर्भात भाष्य केले.
पीके म्हणाले, ''राजस्थानात भाजप काही प्रमाणात काँग्रेसपेक्षा पुढे दिसत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत काँग्रेसने ग्राऊंड लेवलवर काम वाढवले आहे. पण असे असले तरी, भाजप त्यांच्या पुढेच दिसतो आहे. मध्य प्रदेशचा विचार करता, भाजप आणि काँग्रेस यांच्यात येथे चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी मी भाजपला थोडे अधिक झुकते माप देईन. आता छत्तीसगडचा विचार करता, येथेही चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. येथे अनेकांना वाटते की, काँग्रेससाठी येथील निवडणूक सोपी असेल. मात्र, काँग्रेस पक्ष येथे अधिक मजबूद दिसत असला तरी, येथील सामनाही चुरशीचा होईल असे दिसते. यानंतर तेलंगनासंदर्भात बोलताना पीके यांनी, येथे बीआरएसच जिंकेल, असे एका वाक्यात सांगितले.