नवी दिल्ली-
देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची सध्याची अवस्थेवर एका टेलिव्हिजन कार्यक्रमात भाष्य करताना राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. किशोर यांनी काँग्रेस पक्षाला काही सल्ले देऊ केले आहेत. "देशात केवळ विरोधकांना एकत्र करुन काँग्रेसला भाजपाला पराभूत करता येणार नाही. यासाठी काँग्रेसला स्वत:च्याच पक्षात आधी बरेच बदल करावे लागतील", असं प्रशांत किशोर म्हणाले.
काँग्रेस पक्ष सध्या कठीण काळातून जात आहे. पक्षाचे अनेक जुने जाणते नेते सत्ताधारी भाजपामध्ये सामील झाले आहेत. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच प्रशांत किशोर देखील काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. यातच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या भवितव्याबाबत काही विधानं आणि सल्ले देऊ केले आहेत.
"काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर पक्षात काही बदल करावे लागतील. पक्षाचा अध्यक्ष कोण असावा हे मी सांगणार नाही. पण केवळ विरोधी पक्षांची मोट बांधली म्हणजे भाजपाचा पराभव होईल अशा विचारात राहू नये. विरोधक म्हणजे काँग्रेस पक्ष या विचारुन पक्षाला बाहेर यावं लागेल. काँग्रेसला स्वत:ला आधी पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायला हवं याचा निर्णय घ्यावा लागेल", असं प्रशांत किशोर म्हणाले.
"एक राजकीय पक्ष म्हणून पक्षाचा ग्राफ खूप खाली गेला आहे. सर्वात आधी तर पक्षाला आपल्या निर्णय घेण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. निर्णयाच्या पद्धतीसोबतच वेगानं निर्णय घेणं, स्थानिक नेत्यांना सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे. याशिवाय पक्षात निर्णय घेण्याच्या अधिकाऱ्यांचं केंद्रीकरण काँग्रेसनं करू नये. इतर नेत्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची गरज आहे. पक्षाला पुढे जाऊन विजय प्राप्त करण्यासाठी आधी स्वत:मध्ये खूप बदल करावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला प्रशांत किशोर किंवा इतर कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. यासोबतच जो कोणी पक्षाचा अध्यक्ष बनेल तो पूर्णवेळ अध्यक्ष अला पाहिजे", असंही प्रशांत किशोर म्हणाले.