Prashant Kishor News: गेल्या १० वर्षांत राहुल गांधी काँग्रेसला सक्षमपणे चालवण्यात अपयशी ठरत आहेत. गेल्या १० वर्षांत काँग्रेसला अनेक ठिकाणी, अनेकदा अपयश पचवावे लागले आहे. असे असूनही पक्षाची कमान दुसऱ्या कोणाच्या हाती द्यायला हे लोक तयार नाहीत. गेल्या १० वर्षांत एकच काम कोणतेही यश मिळत नसताना सातत्याने केले जात आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यायला हरकत नाही. पुढील ५ वर्षांसाठी पक्षाची धुरा कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सोपवावी, असा सल्ला रणनीतिकार आणि राजकारणातील चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. जगभरात अनेक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत. जर काही कमतरता असतील, तर त्या ओळखून त्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्न करतात. मात्र, राहुल गांधी यांना असे वाटते की, त्यांना सगळे माहिती आहे. जर तुम्हाला वाटत नसेल की, तुम्हाला मदतीची गरज आहे, तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही, ही गोष्ट सत्य आहे. राहुल गांधी यांना असे वाटते की, आपल्याला योग्य वाटेल ते काम अमलात आणणारा कोणीतरी हवा आहे. पण हे शक्य नाही, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला.
जे बोलले, त्याच्या अगदी उलट काम केले
२०१९ मध्ये निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. राहुल गांधी यांनी तेव्हा सांगितले होते की, माघार घेईन आणि काँग्रेसचा कार्यभार दुसऱ्या कुणाच्या हातात देईन. मात्र, प्रत्यक्षात राहुल गांधी जे बोलले, त्याच्या अगदी उलट काम केले. अनेक नेते खासगीत बोलताना सांगतात की, एका व्यक्तीच्या परवानगीशिवाय पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेतला जात नाही. सातत्याने अपयश येऊनही पक्षासाठी एकट्याने काम करावे लागेल, असा आग्रह राहुल गांधींनी धरू नये, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर काँग्रेस पक्ष ४४ जागाच जिंकू शकला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रभावही मर्यादित होता, तरीही काँग्रेसला अपेक्षित परिणाम साध्य करता आला नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.