नवी दिल्ली: आगामी पाच राज्यांमधील विधासभा निवडणुकांसह २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबतही आता राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. अशातच भाजपविरोधात महाआघाडी करून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. अशातच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युला सांगितला असून, विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच आहे का, अशी विचारणा केली आहे.
तुम्ही पंतप्रधान मोदींचे भक्त आहात की, राहुल गांधी यांचे समर्थक या बायनरीमुळे विरोधकांना नुकसान होत आहे. परिस्थिती अधिक आव्हानात्मक आणि तितकीच गुंतागुंतीची आहे. एकूणच राजकीय आणि देशातील परिस्थितीचा बारकाइने विचार करण्याची गरज आहे आणि त्यानंतरच एखादी रणनीति आखली गेली पाहिजे, असे स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे.
एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे
काँग्रेस गेल्या १० वर्षात ५० हून अधिक निवडणुकीत पराभूत झाली आहे. कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असला तरी ज्या पद्धतीने काँग्रेस नेते जनतेत जातात, त्यांच्यात मिसळतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यात काही गडबड आहे. विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेस नाही. इतरही पक्ष आहेत. १९८४ नंतर काँग्रेसने कोणतीही सार्वजनिक निवडणूक जिंकलेली नाही. त्यानंतर १५ वर्ष सत्ता उपभोगली असली तरी १९८९ मध्ये काँग्रेसला १९८ जागा मिलाल्या होता. तरी सरकार बनले नाही. २००४ मध्ये तर केवळ १४५ जागा मिळाल्या होत्या. आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्यात आले. एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे हे यातून दिसून येते, असे प्रशांत किशोर म्हणाले.
भूतकाळात जे झाले, ते पाहून काही धडे घेतले पाहिजे
२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात जो निकाल येईल तोच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही कायम असेल असे नाही. यूपीत जे होईल तेच लोकसभेला होईल, अशी अनेकांची धारणा असून ती चुकीची आहे. भाजपला पराभूत करायचे असेल तर भाजपच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरज नाही. आसाम आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपविरोधी महाआघाडी करण्यात आली होती. मात्र, त्याचे काय झाले हे तुम्हाला माहिती आहे. भूतकाळात जे झाले, ते पाहून काही धडे घेतले पाहिजे. केवळ सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र येणे हा काही रामबाण उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला एक चेहरा हवा. एक विचार हवा. आकडा असावा. प्रचारासाठी मशिनरी हवी. या गोष्टी असतील तर भाजपच्या विरोधात आव्हान उभे करू शकता, असे प्रशांत किशोर यांनी नमूद केले. प्रशांत किशोर यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकांविषयीचे विचार स्पष्टपणे मांडले.
दरम्यान, पंतप्रधान गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहेत. त्यातील १५ वर्ष ते आरएसएसचे प्रचारक होते. त्यामुळे त्यांनी लोकांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी १० ते १५ वर्ष भाजपचे संघटक म्हणून काम पाहिले आहे. कोणत्याही मुद्द्यावर अनेक लोकांकडून माहिती जाणून घेण्याचा त्यांचा गुण आहे. भाजपची राजकीय ताकद संपवणे कठीण आहे. भाजपला इथवर कोणी आणले आहे, हे पाहिले पाहिजे. एक संघटना म्हणून ५० ते ६० वर्ष त्यांनी काम केले आहे, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.