Prashant Kishor News: राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. जनसुराज पदयात्रेचे संयोजक असलेले प्रशांत किशोर हे बिहारमधील समस्तीपूर येथे पदयात्रा करत आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी महाआघाडी, राजद आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जेव्हापासून महाआघाडी स्थापन झाले आहे, तेव्हापासून बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती लोकांच्या मनात आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रशासनाकडे अजिबात लक्ष नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. नितीश कुमार यांनी आपल्या फायद्यासाठी राजकीय मजबुरीत अडकलेले आहेत. कोणती राजकीय युती करायची, कोणाला जोडायचे, कोणाला काढून टाकायचे, सरकार कसे वाचवायचे आणि खुर्ची कशी वाचवायची यावरच नितीश कुमार यांचा संपूर्ण वेळ खर्च होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बघायला त्याला वेळ कुठे आहे, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला.
RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते
कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचे आणखी एक कारण म्हणजे दारूबंदीचा कायदा. दारूबंदी कायदा लागू आहे, मात्र केवळ दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत. परंतु, इथे तर घरोघरी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. प्रशासन यंत्रणा दारूबंदीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली राहणार, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. तसेच बिहारमधील जनतेत अशी कुजबूज आहे की, जेव्हा-जेव्हा राजद सरकारमध्ये असते तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून बिहारची परिस्थिती बिकट होत चालली आहे, ही गोष्ट आपण बिहारमध्येही पाहत आहोत, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.