पाटणा-
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडून राजदसोबत सत्ता स्थापन केली. नितीश कुमारांना या सत्ताबदलावरुन टीकेलाही सामोरं जावं लागत आहे. यातच निवडणूक रणनितीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार अनेकदा भूमिका बदलताना दिसतील असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला. इतकंच नव्हे, तर येत्या तीन वर्षात खरंच नितीश कुमार यांनी राज्यात १० लाख नोकऱ्या दिल्या तर राजकारण सोडून देईन आणि नितीश कुमार यांना आपला नेता म्हणून स्वीकारेन असं खुलं आव्हान प्रशांत किशोर यांनी दिलं आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार हे फेविकॉलसारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत. जर नितीश कुमार यांनी पुढील ३ वर्षात १० लाख नोकऱ्या दिल्या तर मी राजकारण सोडेन आणि नितीश कुमार यांना आपला नेता म्हणून स्विकारेन. नितीश कुमार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. ते आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेकदा पलटी मारताना दिसतील, असं प्रशांत किशोर म्हणाले.
तेजस्वी आणि नितीश जोडीतेजस्वी आणि नितीश ही जोडी विरोधकांच्या निशाण्यावर आहे. 10 ऑगस्ट रोजी नितीश कुमार यांनी राजदच्या पाठिंब्याने आपलं नवीन सरकार स्थापन केलं. लक्षवेधीबाब अशी की तेजस्वी यादव आणि नितीश कुमार आता एकत्र येऊन काम करत आहेत. कालच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. ज्यामध्ये राजदच्या १६ मंत्र्यांना स्थान मिळालं आहे. तेजस्वी यांच्याकडे मंत्रिमंडळात आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लालू प्रसाद यांचे दुसरे पुत्र तेज प्रताप यांनाही मंत्री करण्यात आलं आहे.