दरभंगा : जन सुराजचे नेते प्रशांत किशोर यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी नितीश कुमार पंतप्रधान होण्याबाबत केलेल्या दाव्यांचा समाचार घेतला.
प्रशांत किशोर म्हणाले की, लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते फक्त बोलणारे आहेत. आता तुम्ही राजदची स्थिती पाहता संपूर्ण लोकसभेत 543 पैकी या पक्षाचे 0 खासदार आहेत. लालू प्रसाद यादव इथे त्यांच्या घरी बसतात आणि 4 पत्रकारांना बोलावतात आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार, हे ठरवतात? ज्या पक्षाचे खासदार शून्य आहेत, तो पक्ष देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवत आहे, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.
याचबरोबर, "2015 मध्ये आम्हीच लालू यादव आणि नितीश कुमार यांना एकत्र आणले होते. त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे? हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. नितीशकुमार यांना लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याविषयी प्रेम नाही. बिहार रिकामा झाला तर आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून लालू यादव रोज नितीशकुमारांना दिल्लीत ढकलत आहेत. तसेच, खुर्ची टिकून राहावी म्हणून नितीश कुमार त्यांच्यासोबत आहेत", असे प्रशांत किशोर म्हणाले.
बिहारच्या जनतेने नितीश कुमार यांचे 42 आमदार निवडून दिले आहेत. नितीश कुमार या जनतेला धडा शिकवण्यासाठी लालू यादवांचे जंगलराज परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावरही टीका केली. "जंगलराज परत आल्यावर लोक म्हणतील की, नितीशकुमार यांना विनाकारण हटविले, ते चांगले होते. जर वाईट सरकार सत्तेवर आले तरच लोक नितीशकुमार यांच्याबद्दल चांगले बोलतील. बिहारमध्ये चांगले सरकार आले तर लोक म्हणतील हे चांगले झाले की बिहारची प्रगती सुरू झाली. पण यापेक्षा वाईट सरकार आले तर लोक म्हणतील नितीशकुमार बरे होते", असेही प्रशांत किशोर म्हणाले.