पाटणा: बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडत आरजेडीसोबत सरकार स्थापन केले. पण, राज्यातील राजकीय घडामोडी तिथेच थांबलेल्या नाहीत. आता निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुन्हा नितीशसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाआघाडी सरकारच्या मार्गदर्शक मंडळात असलेले राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना प्रशांत किशोर आवडत नाहीत. अशातच, प्रशांत किशोर पुन्हा नितीशकुमारांचे सल्लागार झाले तर लालू यादव पुन्हा एकदा नाराज होतील का? हे पाहणे महत्वाचे असेल.
बंद दाराआड दोघांमध्ये चर्चाभाजपची साथ सोडल्यानंतर नितीश कुमारांपासून दुरावलेले लोक आता पुन्हा त्यांच्यासोबत येऊ लागले आहेत. यामुळेच प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. बिहारच्या राजकारणात शिरकाव करणारे प्रशांत किशोर पुन्हा नितीशकुमारांचे निवडणूक रणनीतीकार होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 2020 मध्ये नितीश कुमार यांनी पवन वर्मा आणि प्रशांत किशोर यांची JDU मधून हकालपट्टी केली होती, पण आता पवनही नितीशसोबत कमबॅक करू शकतात.
नितीशकुमार काय म्हणाले?प्रशांत किशोरच्या परतण्यावर नितीश यांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. नितीश यांना विचारण्यात आले की प्रशांत किशोर त्यांना भेटायला आले होते का? हे ऐकून नितीश हसायला लागला. ते म्हणाले- 'भेटलोय आणि त्यांच्याशीच बराचवेळ चर्चाही केली. राजकारणावर चर्चा झाली नाही. पवन वर्मांनाही भेटलोय. पवन वर्माचे आमच्यासोबत पूर्वीपासूनच नाते आहे. एखाद्याला भेटण्यात काही गैर नाही.'
प्रशांत-नितीश एकत्र येणार?प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्यात बिहारमधील राजकीय परिस्थितीसोबतच देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या नितीश कुमार यांच्या प्रचारावर तिन्ही नेत्यांमध्ये गंभीर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच, पवन वर्मा आणि प्रशांत किशोर यांच्या मदतीने नितीशकुमार देशभरातील विरोधी शक्तींना एकत्र करतील, असेही बोलले जात आहे. मात्र या प्रकरणी उघडपणे कोणीही बोलायला तयार नाही. सध्या प्रशांत किशोर बिहारमध्ये जन सूरज अभियान चालवत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवसापासून ते पदयात्रा करणार आहेत.