नवी दिल्ली: अलीकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबाशिवाय दुसऱ्या व्यक्तींना देण्यावरही चर्चा झाली. मात्र, त्याला काँग्रेसमधूनच विरोध करण्यात आला. पाच राज्यांत झालेल्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस तयारीला लागले आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) पुन्हा काँग्रेससोबत काम करणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. खुद्द प्रशांत किशोर आणि काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या विधानांमुळे त्यात अजूनच भर पडत होती. मात्र, खात्रीशीर वाटणारा प्रवेश रद्द झाला. आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याचे बोलले जात आहे. खुद्द प्रशांत किशोर यांनीच राहुल गांधींशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे ‘मिशन गुजरात’ प्रशांत किशोरांकडे?
प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात निवडणुकांपुरतेच काँग्रेससाठी काम करणार असल्याचा प्रस्ताव राहुल गांधींशी बोलताना ठेवल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये १८२ जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
दरम्यान, गुजरातमधील निवडणुकांमध्ये भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी काँग्रेससोबत बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी पक्षावर टीका केली होती. पक्षाचे अध्यक्षपद भूषवण्याचा अधिकार कुण्या एका व्यक्तीचा असू शकत नाही. विशेषत: गेल्या १० वर्षांत पक्षाने लढवलेल्या निवडणुकांपैकी ९० टक्के निवडणकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली होती.