पटना : प्रशांत किशोर (Prashant Kishor ) यांनी गेल्या 2 ऑक्टोबरला आपल्या 'जन सुराज' पार्टीची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून नावारुपाला आलेल्या प्रशांत किशोर यांनी आता बिहारमधून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी बुधवारी पुनरुच्चार केला की जनसुराज पार्टी (जेएसयूपीए) उमेदवारांची निवड पक्षाच्या कोणत्याही नेत्याद्वारे किंवा गटाद्वारे केली जाणार नाही.
जनसुराज पार्टीचे संस्थापक सदस्य आणि जनतेने शिफारस केलेल्या व्यक्तीलाच उमेदवार केले जाईल. उमेदवार होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना मोर्चापूर्वी लोकांसमोर आणले जाईल, असेही ते म्हणाले. मार्च ते नोव्हेंबरपर्यंत जनसुराज पार्टीचे संस्थापक सदस्य आणि जनता एकत्रितपणे त्यांचे मूल्यमापन करतील. त्यानंतर ज्यांच्यावर जनमत तयार होईल, ते जनसुराज पार्टीचा अधिकृत उमेदवार असतील, असे प्रशांत किशोर म्हणाले.
'आमचा उपक्रम अमेरिकेसारखा असेल'एक निवेदन जारी करताना प्रशांत किशोर म्हणाले की, हा अनोखा उपक्रम काहीसा अमेरिकेसारखा असेल, जिथे जनता राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारांची निवड करते. अमेरिकेत जेव्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक असते, तेव्हा तिकीट कोणाला मिळणार हे कोणीही व्यक्ती किंवा पक्षाध्यक्ष ठरवत नाही. उमेदवार स्वतःला सादर करतात.
'ही प्रक्रिया बिहारपासून सुरू होईल'प्रशांत किशोर म्हणाले की, उमेदवार जनता आणि पक्ष यांच्यात त्यांचे विचार मांडतात आणि शेवटी जनता त्यांना निवडते, तोच उमेदवार बनतो. भारतातील उमेदवार निवडीची ही प्रक्रिया लोकशाहीची जननी असलेल्या बिहारपासून सुरू होणार आहे.
पार्टी स्थापनेपूर्वी पदयात्रादरम्यान, महात्मा गांधींनी लोकांना एकत्र आणण्यासाठी देशातील पहिला सत्याग्रह केला, त्या चंपारण येथून प्रशांत किशोर यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यभरात 3,000 किमीची 'पदयात्रा' सुरू केली होती. राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणातून मुक्त करणार, असा अजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती. या पदयात्रेत प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहार पिंजून काढले. आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला. आता त्यांनी पार्टी स्थापन करुन सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.