प्रशांत किशोरांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आज निर्णय, समितीने सोनिया गांधींकडे सोपविला रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:28 PM2022-04-25T13:28:53+5:302022-04-25T13:29:52+5:30
Prashant Kishor : आज या समितीने आपला रिपोर्ट हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे. तसेच, या मुद्द्यावर आज 10 जनपथवर म्हणजेच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरकाँग्रेसमध्ये प्रवेश करणार की नाही, याचा निर्णय आज होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली होती. आज या समितीने आपला रिपोर्ट हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे. तसेच, या मुद्द्यावर आज 10 जनपथवर म्हणजेच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मोठे प्रेझेंटेशन दिले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, समितीचे सदस्य केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियंका गांधी वाड्रा 10 जनपथ येथे उपस्थित आहेत. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींसोबत अनेक भेटी घेतल्या आहेत.
नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया
प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. भाजप, जेडीयू, टीएमसी आणि काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने काही वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. बहुतेकांनी पाठिंबा दिला असला तरी अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षांवर सोडला आहे.
दिग्विजय सिंह यांचा प्रशांत किशोरांना पाठिंबा
प्रशांत किशोर यांनी ठोस धोरणात्मक योजना आणली असून समितीने त्यावर अधिक चर्चा केल्याचे दिग्विजय सिंह यांच्यासारख्या काही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. धोरणात्मक योजनामुळे पक्षाला मदत होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की प्रशांत किशोर यांनी यापूर्वी काँग्रेसमधील काही जी-23 नेत्यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी शरद पवारांसह काही विरोधी नेत्यांचीही भेट घेतली होती. नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी एकजुटीने निवडणूक लढवावी, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली.