Prashant Kishor: आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी फार महत्वाचा असणार आहे. आज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या आपल्या राजकीय रणनीतीबाबत मोठा खुलासा करणार आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथील ज्ञान भवनात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. प्रशांत किशोर हे भाजप, काँग्रेस यांसारख्या मोठ्या पक्षांबरोबरच जेडीयू, तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षांसाठी रणनीतीकार राहिले आहेत.
पीके नवीन पक्ष स्थापन करणार?काही दिवसांपूर्वीच पीके काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, काँग्रेसला पीकेंच्या काही अटी न अवडल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे, ते नवीन पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पीके पक्ष स्थापन करणार का? पक्षाचे नाव काय असेल? प्रादेशिक पक्ष असेल का राष्ट्रीय? या प्रश्नांची उत्तरे आजच्या पत्रकार परिषदेतून मिळतील.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर चर्चेत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेवर आणल्यामुळे प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एक उत्कृष्ट निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख देशभर पसरली. निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ते नेहमीच पडद्याआड राहिले आहेत. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी आफ्रिकेतून युनायटेड नेशन्स (UN) ची नोकरी सोडून पीके 2011 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील झाले. मोदींच्या चाय पे चर्चा, थ्रीडी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन यासारख्या प्रगत विपणन आणि जाहिरात मोहिमांचे श्रेय पीकेंना जाते. ते इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) नावाची संस्था चालवतात.