नवी दिल्ली- पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवणं, प्रादेशिक पक्षांनी वर मान काढायला सुरुवात करणं ही भाजपासमोरील सध्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यातच गुजरातमध्ये काँग्रेसने दिलेली टक्कर आणि राजस्थानच्या पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव यामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण होत. पण आता भाजपाला दिलासा देणारी नवी शक्यता ऐकायला मिळत आहे, ती म्हणजे निवडणूकतज्ज्ञ प्रशांत किशोर पुन्हा भाजपासाठी येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. हिंदुस्तान टाइम्सनो याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या या वृत्तानुसार प्रशांत किशोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहेत आणि प्रशांत किशोर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही भेटले आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर २०१९ साली होणार्या लोकसभा निवडणुकसाठी भाजपाबरोबर काम करतील अशी शक्यता निर्माण झाल्याचे खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यापुर्वी प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी २०१२ सालच्या गुजरात विधानसभेसाठी आणि नंतर २०१४ या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी काम केले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांचे भाजपाशी समबंध फार काळ सुरळीत राहिले नाहीत.
त्यानंतर २०१५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस, जदयू, राजद आघाडीसाठी काम करुन त्यांना यश मिळवून दिले. त्यामुळे एक आघाडीचे यशस्वी निवडणूक धोरणतज्ज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. बिहारनंतर त्यांनी काँग्रेससाठी उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी काम केले.
पंजाबमध्ये काँग्रेसची सगळी सूत्रे कँ. अमरिंदर सिंग यांच्याकडे असल्याने त्या निवडणुकीत त्यांचा ठसा दिसला नाही आणि भाजपाच्या रेट्यापुढे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे काहीच चालले नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. जदयू आणि भाजपा पुन्हा एकत्र आल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा भाजपाच्या दिशेने वळल्याची चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्याही जवळचे मानले जातात. त्याचाच परिणाम म्हणून हा नवा बदल दिसत असावा