पटना : जनसुराज पक्षाचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपला नवा राजकीय पक्ष सत्तेवर आल्यास तासाभरात बिहारमधील दारूबंदी हटवू, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. रविवारी प्रशांत किशोर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
दारूबंदीचा निर्णय म्हणजे नितीश कुमार यांनी केलेली एकप्रकारे फसवणूक आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. दरम्यान, सरकारच्या सध्याच्या दारुबंदीच्या निर्णयावर प्रशांत किशोर यांनी टीका केली आहे. तसेच, तो निर्णय अप्रभावी ठरल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. पुढे प्रशांत किशोर म्हणाले की, बंदीमुळे बेकायदेशीर घरगुती दारू वितरण वाढले आहे.
या निर्णयामुळे २०,००० कोटी रुपयांच्या संभाव्य उत्पादन शुल्क महसूलापासून राज्याला वंचित ठेवले आहे. तसेच, राजकारणी आणि नोकरशहांवर अवैध दारूच्या व्यापारातून फायदा होत असल्याचा आरोपही प्रशांत किशोर यांनी केला. तसेच, 'योग्यतेच्या राजकारणावर' विश्वास आहे आणि निषेधावर बोलण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांचा पक्ष विधानसभेच्या सर्वा जागा लढणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपला पक्ष बिहारमधील सर्वच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवेल, तसेच ४० जागांवर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. याशिवाय, आपला पक्ष २०३० च्या विधानसभा निवडणुकीत ७० ते ८० जागांवर महिला उमेदवार देईल, असेही त्यांनी जाहीर केले होते.