नवी दिल्ली - जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या धोरणांना विरोध दर्शविणारे किशोर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशांत किशोर तृणमूलमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. किशोर यांना बुधवारी जदयूमधून काढून टाकण्यात आले आहे. या संदर्भात तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले. मात्र या संदर्भात अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी भविष्यात असं काही होणार नाही, असंही ठामपणे सांगितले नाही.
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसची रणनिती ठरविणार आहेत. तृणमूल प्रवेशासंदर्भात विचारण्यासाठी किशोर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून एनआरसी आणि नागरिकता संशोधन कायद्याचा विरोध करत आहेत. मात्र प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार की, नाही याचा निर्णय पक्ष नेतृत्वच घेणार असल्याचे पक्षाचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले.