हरिश गुप्ता -
नवी दिल्ली : भूतकाळातील फसलेल्या वाटाघाटीनंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर व काँग्रेस हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र काम करू शकतात, असे दिसते.
सूत्रांनी सांगितले की, पीके यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेत्यांसमोर ४ तास सादरीकरण केले. भाजपाचा पराभव करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रशांत यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. जी-२३ गटातील कोणालाही बैठकीचे निमंत्रण नव्हते.
रणनीती काय? -- लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३५० जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित करावे. उरलेल्या जागी समविचारी पक्षांशी आघाडी केली जाऊ शकते. भाजपा अजिंक्य नाही. योग्य रणनीतीच्या बळावर भाजपाचा पराभव केला जाऊ शकतो. - काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पीके यांच्या सादरीकरणाला दुजोरा दिला; मात्र तपशील सांगण्यास नकार दिला. - सूत्रांनी सांगितले की, पीके यांच्या सादरीकरणावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. समिती आठवडाभरात पक्षाध्यक्षांना अहवाल देईल.
भविष्यात काय करायचे याचा निर्णय मी २ मेपर्यंत घेईन. कारण २ मे रोजीच मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला होता. - प्रशांत किशोर
सोनिया गांधी यांच्या घरी सादरीकरण झाले. त्यात राहुल, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खारगे, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, ए. के. ॲन्टोनी, दिग्विजय सिंग, अजय माकन, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम व रणदीप सुरजेवाला यांचा समावेश होता.