देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. याच बरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, यावेळचे बहुतांश एक्झिट पोल चुकीचे ठरले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला 350 ते 400 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला केवळ 240 जागाच मिळाल्या. भाजप साठी 2014 आणि 2019 च्या तुलनेत ही सर्वात खराब कामगिरी राहिली. विशेष म्हणजे, यावेळी केवळ एक्झिट पोलच नव्हे, तर अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाजही साफ चुकीचे ठरले. यामुळे आता या राजकीय विश्लेषकांवरच प्रश्न उपस्थित होत आहे. यातच एक नाव म्हणजे, निवडणूक रणनितीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर...
प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले अनेक दावे चुकीचे ठरले आहेत. त्यांनी निवडणूक निकालानंतर एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या दाव्यांसंदर्भात अथवा भविष्यवाणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.
मुलाखतीत प्रशांत किशोर यांना काय विचारण्यात आलं? -- आपण म्हणाला होतात की भाजप 2019 सारखीच कामगिरी करेल आणि 2019 प्रमाणेच 303 अथवा त्याहून अधिक जागा मिळवेल, मात्र असे झाले नाही?- आपण दावा केला होता की, काँग्रेसला 100 हून कमी जागा मिळतील. मात्र असे झाले नाही?- आपण म्हणाला होतात की, पश्चिम बंगालमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. मात्र असेही घडले नही? - आपण म्हणाला होतात की, राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजपला फारसे नुकसान होणार नाही, जे होईल ते भाजप दक्षिणेतून भरून काढेल. हेही खरे ठरले नही?
अशा प्रश्नांना उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले, ठीक आहे... यात इगोचे काही कारण नाही. कुणाचेही अंदाज चुकीचे ठरू शकतात. या निवडणुकीत अखिलेश यादव हिरो ठरले आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांनी 400 जागा मिळतील असा दावा केला होता, मात्र त्यांना केवळ 125 जागा मिळाल्या. याचा अर्थ त्यांची राजकीय समज कमी झाली असा होत नाही. अमित शहा यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकल्याचा दावा केला होता. मात्र, ते खरे ठरले नाही. याचा अर्थ त्यांना राजकीय समज नाही असा होत नाही.
याशिवाय, राहुल गांधी मध्यप्रदेशात म्हणाले होते, आमचे सरकार बहुमताने येत आहे. मात्र तेथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. याचा अर्थ त्यांना कळत नाही असे नाही. या निवडणुकीसंदर्भात मी म्हणेन की, होय माझे आकडे चुकीचे ठरले आहेत. पण, भाजपला केवळ 180 जागाच मिळतील, असे ज्यांनी म्हटले होते, त्यांचे दावेही खोटेच ठरले आहेत. तसेच, भाजपचे सरकार येईल, असे म्हणणाऱ्यांचे सरकार आले आहे. मात्र, जागांसंदर्भातील आकडे निश्चितचपणे चुकीचे ठरले आहेत, असेही प्रशांत किशोर म्हणाले.