बुलंदशहर : उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलीस निरिक्षकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रशांत नट याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलंदशहराचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत नटनेच सुबोध सिंह यांची हत्या केली होती. प्रशांतला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. सुबोध सिंह यांची ज्या रिव्हॉल्वरने हत्या करण्यात आली ते अजून आम्हाला मिळालेले नाही असेही चौधरी यांनी सांगितले आहे.
उत्तरप्रदेशचे एडीजी आनंद कुमार यांनी सुबोध सिंह यांची हत्या प्रशांत नटने केली तो या प्रकरणातला मुख्य संशयित आहे असे म्हटले होते. त्यानंतर तीन ते चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि प्रशांत नटला अटक करण्यात आली. आत्तापर्यंत सुबोध सिंह यांच्या हत्याप्रकरणात योगेश राज याचा हात आहे असे मानले जात होते. चौकशीदरम्यान प्रशांत नट याने सुबोध सिंह यांच्यावर गोळीबार केल्याचे मान्य केले आहे.
बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 22 जणांना अटक केली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच एक दंगलखोरही या हिंसाचारात मृत्युमुखी पडला.