नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 79,09,960 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 480 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरून विरोधकांनी भाजपाला घेरले आहे. भाजपा कोरोनावरील लसीचा राजकीय फायदा उठवू पाहत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र याच दरम्यान कोरोना लसीबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे.
देशातील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी म्हटलं आहे. बालासोरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत मिळणार असून एका व्यक्तीला लस उपलब्ध करून देण्यासाठी पाचशे रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपाच्या या आश्वासनावरून निशाणा साधला आहे. "फक्त बिहारमध्येच का? मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
"फक्त बिहारमध्येच का?, मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क"
अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील जनता कोरोना संसर्गामुळे प्रभावित झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे असं म्हटलं आहे. "जेव्हा कोरोनावरील लस उपलब्ध होईल, तेव्हा मोफत मिळावी, हा देशातील नागरिकांचा हक्कच आहे" असं ते म्हणाले. केंद्राकडून अत्यावश्यक गटासाठी थेट लस उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य आणि जिल्हा यंत्रणेना केंद्राकडून ही लस थेट खरेदी करता येईल, त्यानंतर ती अत्यावश्यक गटांना उपलब्ध करून देता येईल असंही म्हटलं आहे.
केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली होती. कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपाच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही तमिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिलं आहे.