उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये बुलडोझरची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतापगड येथील बलात्काराची घटना घडलेल्या आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर पोहोचताच आरोपींनी दुसऱ्याच दिवशी आत्मसमर्पण केलं आहे. आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता, पोलीस त्याच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकत होते. पण तो आरोपी काही हाती लागत नव्हते. अखेर राहत्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी प्रशासन पोहोचताच आरोपीनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
"गुन्हेगारी आणि गुन्हेगारांबाबत झिरो टॉलरन्सच्या धोरणाखाली आम्ही आगामी काळातही अशीच कठोर पावलं उचलत राहू, बदमाशांना कायद्याचा धाक आहे, त्यांना वाटतं की जर ते पळून गेले तर. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यामुळे गुन्हेगार आत्मसमर्पण करत आहेत", असं एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले.
प्रतापगडमध्येही बलात्काराची एक संतापजनक घटना घडली होती, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवर एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. आरोपी फरार होता. त्याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात आले. यासोबतच एक पथक बुलडोझरसह त्याच्या घरी पोहोचलं. यानंतर गुन्हेगारानं आत्मसमर्पण केलं. प्रशांत कुमार यांना बुलडोझरच्या भीतीने आरोपीच्या आत्मसमर्पणाबाबत विचारणा केली असता त्यांनी बुलडोझरच्या भीतीने आत्मसमर्पण करण्याची बाब नाकारली परंतु गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती आहे आणि असलीच पाहिजे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यापुढेही अशा प्रकरणात कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले.
प्रशासनाचा बुलडोझर कोणावर चालतो?"दोन प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये बुलडोझर चालतो. कुणी सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल किंवा कुणी बेकायदेशीर बांधकाम केले असेल आणि नोटीस देऊनही ते हटवलं गेलं नसेल तर ते आम्ही स्वतः ते तोडत नाही. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जाते", असं प्रशांत कुमार म्हणाले. तसंच गुन्हेगार जेव्हा सतत पळ काढत असतो, कायदेशीर प्रक्रिया आणि वॉरंटनंतरही शरण येत नाही, तर त्यानं गुन्ह्यातून कमावलेल्या मालमत्तेवर जप्तीचा आदेश घेऊन प्रशासन बुलडोझर चालवण्याची कारवाई करतं, असंही ते म्हणाले.