भाजप नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्याला अटक केली आहे. २६ जुलै २०२२ मध्ये नेट्टारू यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. तेव्हापासून या आरोपीच्या शोधात होती. परदेशातून भारतात परतताच एनआयएने विमानतळावर त्याला अटक केली.
भाजप युवा मोर्चाचे प्रवीण नेट्टारू यांची बेल्लारे येथे २६ जुलै २०२२ रोजी त्यांच्या दुकानासमोर हत्या करण्यात आली होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या किलर स्वॉडने त्यांची हत्या केल्याचे तपासातून समोर आले होते. कर्नाटक सरकारने या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएला सोपवण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालायाकडे केली होती.
२७ जुलै २०२२ रोजी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आणि ४ ऑगस्टर २०२२ रोजी एजन्सीने गुन्हा दाखल केला होता.
मोहम्मद शरीफला दिल्ली विमानतळावर अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या फरार असलेल्या सदस्याला भाजप नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. कोडजे मोहम्मद शरीफ यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. बहारिनवरून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
प्रवीण नेट्टारू यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत मोहम्मद शरीफसह २० जणांना अटक करण्यात आली आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी प्रवीण नेट्टारूची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कर्नाटकात हिजाब वाद सुरू झाला होता. त्याच काळात ही हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या हर्ष या कार्यकर्त्याचीही हत्या केली गेली होती.