नवी दिल्ली - एकेकाळचे जीवलग मित्र असलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमधून आता विस्तवही जात नाही. आता मात्र प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा देत भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. तोगडिया यांनी मोदींना लिहिलेले पत्र हे मोदींसोबतच्या मैत्रीची नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न मानण्यात येत आहे. या पत्रात जुन्या आठवणींना उजाळा देताना तोगडिया लिहितात, "बऱ्याच काळापासून आपल्यामध्ये मनमोकळेपणाने बोलणे झालेले नाही. जसे 1972 ते 2005 या काळात व्हायचे. देश, गुजरात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात जे प्रश्न उपस्थित झाले. त्यावर आपण दोघांनीही वेळोवेळी एकमेकांसोबत राहून काम केले आहे. आमचे घर आणि कार्यालयात तुमचे येणे, सोबत भोजन, चहापान करणे, मनमोकळेपणाने हसणे यापैकी काहीही तुम्ही विसरला नसाल," एकमेकांसोबत व्यतित केलेल्या काळाविषयीही तोगडिया यांनी उल्लेख केला आहे."मित्रत्व आणि मोठा भाऊ या नात्याने आपली विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायची. एकमेकांसाठी एकमेकांसोबत उभे राहायचो. जे 2002 नंतर कमी होत गेले. सत्तास्थानी गेल्यानंतर तुम्ही माझ्यापासून आणि मूळ विचारसरणीपासून फारकत घेतली. तरीही आजही माझ्या मनात मित्रत्व आणि संवादाची अपेक्षा कायम आहे, त्यामुळेच हा पत्रप्रपंच केला आहे." राम मंदिर, गोवंश हत्या, समान नागरी कायदा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, असेही तोगडिया यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रवीण तोगडियांनी जुन्या आठवणी जागवत मोदींना लिहिले भावूक पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 8:50 PM