नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने संरक्षण दलातील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी गेल्यावर्षी घेतलेल्या कंबाइन डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस)-१ या परीक्षांचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर केला असून, त्यात १४७ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यात पुरुष परीक्षार्थींमध्ये प्रवीण व महिला परीक्षार्थींमध्ये चिन्मयी व्यंकटेश हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ११३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स व २७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी पुरुष उमेदवारांची व २७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. चेन्नईतील ऑफिस ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. लष्करामध्ये अधिकाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाकडे असते. त्या संस्थेकडून या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पंधरा दिवसांत यशस्वी परीक्षार्थींना किती गुण मिळाले हे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यातयेईल.या परीक्षेत पुरुष परीक्षार्थींमध्ये प्रथम क्रमांक प्रवीण यांनी पटकाविला असून, क्षितिज प्रकाश श्रीवास्तव दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. वैभव शर्मा, सिद्धार्थ कोंटला, अक्षय तोमर हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या स्थानी आहेत.
सीडीएस-१ परीक्षेत प्रवीण, महिलांमध्ये चिन्मयी अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:12 AM