नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सुनील भराला यांनी ''पराली' पेटवण्याच्या मुद्द्यावर जितकं लक्ष दिलं जातं, तितकं लक्ष आपल्या जुन्या परंपरा म्हणजेच ज्या प्रकारे पावसासाठी इंद्रदेवाला खूश केलं जातं त्याकडे द्या. त्यामुळे आता इंद्रदेवाला खूश करण्यासाठी यज्ञ करा. इंद्रदेव सगळं काही ठीक करतील अशी सरकारला विनंती आहे' असं देखील म्हटलं आहे.
नोएडा परिसरातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 4 आणि 5 नोव्हेंबरला बंद राहतील. बारावीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळ्याच्या मोसमात फटाके फोडण्यासही ईपीसीएने बंदी घातली. यासंदर्भात या संस्थेचे अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिल्ली, एनसीआर या भागांमध्ये गुरुवार रात्रीपासून प्रदूषणाने अतिधोकादायक स्तराची पायरीही ओलांडली आहे. त्यामुळे दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नॉयडा, ग्रेटर नॉयडा या भागांतील बांधकामे, हॉट मिक्स प्लांट, स्टोन क्रशर येत्या मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात यावेत.