किरण अग्रवाल
प्रयागराज - कुंभमेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराज तीर्थ येथे देश-विदेशातून हजारो भाविक दाखल झाले असून मकर संक्रांतीच्या दिनी 15 जानेवारी रोजी पहिले शाही स्नान होणार आहे त्यासाठी अलाहाबाद नगरी सज्ज झाली आहे.
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये साधुग्राम म्हणून अस्थायी शहर वसविण्यात आले असून त्यात विविध आखाडे व त्यांच्या महंत तसेच महामंडलेश्वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. साधुग्राममध्ये जाण्यासाठी नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लोखंडी ड्रमसवर 24 तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत. सर्वच आखाड्यांमध्ये भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अहोरात्र भंडाराही सुरू आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे हभप रामकृष्ण लहवीतकर महाराज व त्यांचे अनुयायीही शाही स्नानात सहभागी होणार आहेत.
कुंभमेळ्यासाठी अवघी प्रयागराज नगरी सजली असून जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सरकारी इमारतींवर तसेच शहरातील पुलांवर व चौकांवर कुंभशी निगडित धार्मिक चित्रे चितारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही गेल्या दीड वर्षात केलेल्या कामगिरीचे फलक जागोजागी लावले आहेत.
दरम्यान आज काशी येथील कैलास मठाचे स्वामी आशुतोषानंद गिरी यांचा महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक संपन्न झाला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पट्टाभिषेक सोहळा पार पडला. तर उद्या शाही स्नानाच्या एक दिवस अगोदर दिनांक 14 रोजी केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री गुरू निरंजन ज्योती गिरी यांचा पंचायती आखाडा श्री निरंजनचे महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक होणार आहे. यावेळी अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.