देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. हे असं असतानाच विविध आजार देखील डोकं वर काढताना दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्यासह अनेक आजारांनी लोक त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. रुग्णालयाचा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना प्रयागराज जिल्ह्यामध्ये हलगर्जीपणा पाहायला मिळाला. एका डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्सच्या जागी मौसंबीचा ज्युस चढवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी याबाबत ट्विट केलं असून दोषींवर कठोर कारवाईचं आदेश दिले आहेत.
धक्कादायक प्रकाराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ग्लोबल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना प्लेटलेट्सच्या जागी मोसंबी ज्युस दिला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडली आहे. तसेच या भयंकर घटनेनेनंतर रुग्णालय देखील सील करण्यात आलं असून प्लेटलेट्सचं पॅकेट हे तपासणीसाठी देण्यात आलं आहे.
प्लेटलेट्सच्या तपासणीबाबत विचारले असता, जिल्हाधिकारी संजय कुमार खत्री यांनी प्लेटलेट्सचीही चाचणी केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू असं म्हटलं आहे. रुग्णालय व्यवस्थापन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी धूमनगंज रुग्णालयाचे मालक सौरभ मिश्रा यांनी सांगितले की, प्रदीप पांडे यांना डेंग्यू झाला असून त्यांना त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.