प्रयागराज महाकुंभमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. या भाविकांसाठी विविध ठिकाणी अन्न वाटपाचं आयोजन केलं जात आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रयागराजच्या सोराव पोलीस स्टेशन परिसरातील एक इन्स्पेक्टरने भंडाऱ्यात राख टाकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण अन्न खराब झालं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, डीसीपींनी या प्रकरणाची दखल घेतली आणि इन्स्पेक्टरला निलंबित केलं आणि प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नऊ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवलं जात असल्याचं दिसून येतं. जवळच जेवण बनवणारे लोक उभे आहेत. त्याच दरम्यान इन्स्पेक्टर ब्रिजेश तिवारी अन्नात राख टाकतात. हे अन्न लोकांना वाटण्यासाठी तयार केलं जात होतं, पण इन्स्पेक्टरने त्यात राख टाकून संपूर्ण अन्न खराब केलं.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रशासनावर यावरून निशाणा साधला आहे. या व्हिडिओबाबत पोलिसांच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि या घटनेला अतिशय दुर्दैवी म्हटलं. महाकुंभमधील लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करणाऱ्या लोकांसोबत हे असं घडत आहे. राजकीय वैमनस्यामुळे चांगले प्रयत्न वाया जात आहेत. जनतेने दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना प्रयागराजच्या सोरावं परिसरातील फाफामऊ-सोरावं सीमेवरील मलाक चतुरी गावात घडली. जिथे भाविकांसाठी भंडारा आयोजित केला जात होता. परंतु परवानगीशिवाय भंडारा आयोजित केल्यामुळे जेवणात राख मिसळून ब्रिजेश तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली.