Encounter Statistics in India: उमेश पाल हत्या प्रकरणातील आणखी एका शूटरला प्रयागराज पोलिसांनी चकमकीत ठार केले. आज ज्याची चकमक झाली, त्याचे नाव विजय चौधरी उर्फ उस्मान आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की चकमकीत तो जखमी झाला होता, त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. उमेश पाल यांची २४ फेब्रुवारी रोजी घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात उमेश पालचे दोन सुरक्षा रक्षकही मारले गेले. उमेश पाल हे २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होते. राजू पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी माजी खासदार अतिक अहमद सध्या गुजरात तुरुंगात आहे.
कोण होता विजय चौधरी उर्फ उस्मान?
उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी पतीच्या हत्येप्रकरणी अतिक अहमद, त्यांची पत्नी शाइस्ता परवीन, भाऊ अशरफ, दोन मुले, गुड्डू मुस्लिम आणि गुलाम यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय चौधरी उर्फ उस्मान, ज्याचा आज प्रयागराज पोलिसांनी पाठलाग करून एन्काऊंटर केला त्यानेच उमेश पाल यांच्यावर पहिली गोळी झाडल्याचा आरोप आहे.
धुमगंजचे एसएचओ राजेश कुमार मौर्य यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विजय चौधरीच्या मानेवर, छातीत आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, चकमकीदरम्यान कॉन्स्टेबल नरेंद्र पाल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विजयच्या एन्काऊंटरवर पोलिसांनी दिलेल्या माहितीवर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विजयची पत्नी म्हणते, "माझ्या पतीसह मलाही मारले पाहिजे होते, कारण माझ्या मागे कोणीही नाही त्यामुळे मी कोणासाठी जगायचे?"
दरम्यान, पोलीस चकमकीवर म्हणजे एन्काऊंटवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा अनेकदा केला जातो त्यामुळे चकमकीवर बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहेत. अशा स्थितीत पोलीस कोणावर गोळीबार कधी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान, जाणून घेऊया देशातील एन्काऊंटरबद्दलची आकडेवारी काय सांगते...
6 वर्षात 813 एन्काऊंटर- गेल्या वर्षी 23 मार्च रोजी देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी चकमकीबद्दलच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती. ही आकडेवारी 1 एप्रिल 2016 ते 10 मार्च 2022 पर्यंतची होती. त्यानुसार 6 वर्षात 813 जणांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. यात छत्तीसगडमध्ये सर्वाधिक २६४ एन्काऊंटर झाले आहेत. तर उत्तर प्रदेशात 121 गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तर बिहारमध्ये २५ एन्काऊंटर झाले आहेत.
महिन्याला १० गुन्हेगारांचा एन्काऊंटर- सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, चकमकीत हत्येचे 813 प्रकरणांपैकी 459 निकाली काढण्यात आली आहेत, तर 354 प्रकरणांचा तपास सुरू आहे. म्हणजेच एकूण 6 वर्षात दर महिन्याला 10 गुन्हेगार चकमकीत मारले गेले.
दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलीस चकमकीच्या 107 प्रकरणांमध्ये नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. या दरम्यान पीडितांना 7.16 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली.