नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नोकरी न मिळाल्याने योगी सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. सलोरी भागातील प्रयाग स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून विद्यार्थ्यांनी ट्रॅकवरच तळ ठोकला आणि बराच वेळ आंदोलन सुरूच ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत त्यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं आणि पुढील कारवाई करण्यात आली. यासंदर्भातले काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात पोलीस हॉस्टेलमध्ये घुसून आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहेत, ज्यांनी रस्त्यावर गोंधळ निर्माण केला.
काही पोलीस बंदुकीच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले, तर काही जण लाथा मारून दरवाजा तोडत होते. परिसरात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेत असल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी योगी सरकारला घेरलं आहे. विद्यार्थ्यांवर होणारा हा अत्याचारा त्वरीत थांबवला गेला पाहीजे अशी मागणी केली आहे. तसेच भाजपावर देखील यावरून जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे.
"विद्यार्थ्यांच्या लॉज, हॉस्टेलची तोडफोड आणि मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह"
प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांन याबाबतचे काही व्हिडीओ हे शेअर केले आहेत. "प्रयागराजमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या लॉज आणि हॉस्टेलची तोडफोड करणे आणि त्यांना मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. प्रशासनाने ही जाचक कारवाई त्वरित थांबवावी. तरुणांना रोजगाराबाबत बोलण्याचा पूर्ण अधिकार असून या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली
हे आंदोलन NTPC च्या निकालाबाबत म्हणजेच RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) मधील नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती संदर्भात केले जात आहे. मंडळाने शेवटच्या क्षणी नियमात बदल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच सेवेत घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मते, प्रत्यक्षात हा आकडा 20 टक्के असायला हवा होता. आता ती मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली, ट्रॅकला घेराव घालण्यात आला आणि बराचवेळ गोंधळ घातला गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.