हैदराबाद - चोरीच्या वेगवेगळ्या घटना या सातत्याने समोर येत असतात. अनेकदा चोरट्याचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतं. अशाच एका अजब चोराने केलेल्या चोरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंदिरात चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. चोरी करण्याआधी त्याने दुर्गा मातेसमोर उठा-बशा काढल्या, कान पकडले, मूर्तीला वाकून नमस्कार केला आणि देवीची माफी मागितली. यानंतर देवीचा मुकूट घेऊन चोरटा पसार झाला. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. मंदिरातल्या चोरीच्या व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील हैदराबादच्या अबिड्स परिसरात दूर्गा मातेचं मंदिर आहे. या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. देवीचा मुकूट चोरताना चोरटा मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंदिरात चोराने प्रवेश केला. देवीच्या मूर्तीसमोर काही उठा-बशा काढल्या. कान पकडून माफी मागितली. तसेच नमस्कार केला. मंदिरात पुजारी नाहीत ही संधी साधून चोराने देवीचा मुकूट चोरून तो आपल्या शर्टाच्या आतमध्ये लपवून तो मंदिरातून पसार झाल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे.
देवीचा 25 किलो चांदीचा मुकूट चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. व्हिडीओच्या आधारे चोराचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ तसेच शोभेच्या वस्तूही चोरांनी लंपास केल्या. सत्येंद्र यांनी रविवारी (22 सप्टेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आरोग्यमंत्री जैन यांनी चोरीच्या घटनेनंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं होतं. यामध्ये दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या त्यांच्या घराचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोमध्ये घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. दिल्लीतील चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असं ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं.