माणुसकीला काळीमा फासेल असा एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातून समोर आला आहे. एका गरोदर महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलच्या बेडची साफसफाई करायला सांगितली. महिलेच्या पतीला गोळी लागली होती, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
जमिनीच्या वादातून चौघांवर गोळ्या झाडल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत महिलेचा पतीही जखमी झाला होता. मात्र त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुरावा गोळा करण्यासाठी महिलेने स्वतःच रक्त स्वच्छ करण्यास करेन म्हटलं होतं, असा दावा आता रुग्णालयाने केला आहे, मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
दिंडोरीतील लालपूर गावात गुरुवारी जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी शिवराज याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवराजची पत्नी रोशनी ही पाच महिन्यांची गरोदर आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोशनीच्या एका हातात रक्ताने माखलेलं कापड आहे आणि दुसऱ्या हाताने टिश्यू पेपरने बेड साफ करताना दिसत आहे. ही घटना गडसराय आरोग्य केंद्रात घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर आरोग्य विभागाप्रती लोकांचा रोष पाहायला मिळत आहे.
रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रशेखर टेकम यांनी स्पष्टीकरण दिलं. कर्मचारी रुग्णालयात उपस्थित असल्याचे सांगितले. महिलेला बेड साफ करण्यास सांगितलं नाही. ते गुरुवारी जमिनीच्या वादात जखमी झालेल्या दोन लोकांना आमच्या केंद्रात आणण्यात आलं. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीनेच बेड पुसायचा असल्याचं सांगितलं. महिलेची किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही.