बिहारच्या आरा जिल्ह्यात एका महिलेने एकाचवेळी ४ बाळांना जन्म दिला. विशेष म्हणजे लग्नानंतर ३ वर्षे होऊनही महिलेला बाळ झाले नाही. त्यामुळे, मूल व्हावे म्हणून महिलेने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले, तसेच घरी पूजापाठही करत. अखेर देवाने महिलेची प्रार्थना ऐकली आणि ४ वर्षानंतर महिलेने बाळाला जन्म दिला. त्यावेळी, चक्क ४ मुलांना तिने जन्म दिला असून सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे, कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
ज्ञानती देवी असं महिलेचं नाव असून तिचे पती म्हणजेच मुलांचे वडिल हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. सन २०१३ मध्ये त्यांचं लग्न झालं होत. २०१५ मध्ये गौना म्हणजेच बिहारमधील लग्नाची प्रथा ज्यात नववधुला वराच्या घरी आणले जाते. गौना झाल्यानंतर ज्ञानती देवीला भरत यादव यांनी त्यांच्या घरी आणले. लग्नानंतर ३ वर्षे झाल्यानंतरही त्यांची पत्नी गर्भवती होत नव्हती. त्यामुळे, त्यांनी जवळील एका डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यानुसार उपचारपद्धतीही सुरू केली. त्यामुळे, त्यांना एक मुलगी झाली, जी आजमित्तीस तीन वर्षांची आहे.
मुलगी चांदणीच्या जन्मानंतर अडीच वर्षांनी ज्ञानतीला एक मुलगाही झाला होता. त्यानंतर, आता तिने एकाचवेळी ४ मुलांना जन्म दिला. त्यामुळे, यादव कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आता, ज्ञानती व भरत यांना एकूण ६ अपत्ये झाली आहेत. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन समाजात ताठ मानेनं जगता येईल, असं नागरिक बनवायचं असल्याचं वडिल भरत यादव यांनी म्हटलं.
वैद्यकीय शास्त्रानुसार जुळी मुले किंवा तीन बाळांचा एकाचवेळी जन्म होणे ह्या बहुदा साधारण घटना मानल्या जातात. मात्र, ४ मुलांना एकाचवेळी जन्म दिल्याची घटना असाधारण आहे. १० लाख मातांनी बाळांना जन्म दिल्यानंतर एखादी अशी घटना घडते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुदैवाने ज्ञानतीने जन्म दिलेल्या चारही बाळांची प्रकृती उत्तम आहे.