सहारनपूर, दि. 17- सहारनपूरच्या जिल्हा हॉस्पिटलमधील लाजिरवाणी घटना समोर आली आहे. तेथिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेला धक्का देऊन निर्दयीपणे हॉस्पिटलच्या बाहेर काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. या महिलेला तिचे नातेवाईक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी घेऊन जात असताना तिने ई-रिक्शात बाळाला जन्म दिला. या महिलेला आणि तिच्या बाळाता आता एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी थाना जनकपुरीमध्ये या संबंधातील तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये 14 ऑगस्टच्या रात्री खजूरतलाचे रहिवासी असणारे मोहम्मद रईस यांच्या पत्नीला मुनव्वरला प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मुनव्वर यांना घेऊन त्यांची शेजारीण आशा काही नातेवाईक जिल्हा हॉस्पिटलमध्ये आले होते. हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला दाखलही करण्यात आलं. मुनव्वर यांचे गरोदरपणाचे महिने पूर्ण झाले होते. त्यांची प्रसुती होण्याआधी एखाद्या वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना चेक करावं. पण त्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना बोलविण्या ऐवजी काहीही विचारपूर न करता मुनव्वर यांना धक्का देऊन हॉस्पिटलच्या बाहेर काढलं, असा आरोप नातेवाईकांकडून केला जातो आहे. मुनव्वर आणि त्यांचे कुटुंबिय त्या कर्मचाऱ्यांकडे विनंती करत होते पण कर्मचाऱ्यांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही, असाही आरोप केला जातो आहे.
जिल्हा हॉस्पिटलमधून बाहेर काढल्यावर मुनव्वर यांना ई-रिक्शातून जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे नातेवाईक घेऊन जात होते. पण मुनव्वर यांनी त्या ई-रिक्शामध्येच बाळाला जन्म दिला.जिल्हा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे मुन्नवर यांना खासगी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. मुन्नवर आणि त्यांचं नवजात बाळ दोघांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळते आहे. बुधवारी आशा आणि मुनव्वर यांचे पती मोहम्मद रईस यांनी थाना जनकपुरी जाऊन या प्रकरणातील हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तक्रार मिळाली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाईल तसंच दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं, थाना जनकपुरीचे प्रभारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितलं आहे.