बरेली : यापुढे हज यात्रेसाठी भारतातील गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही. केंद्रीय हज समितीने हा निर्णय घेतला आहे. हज यात्रा सप्टेंबरपासून सुरू होत असून, त्यासाठी अर्ज करताना महिला गरोदर असेल आणि सप्टेंबरपर्यंत चार महिने पूर्ण झाले असतील तर तिला हजला जाता येणार नाही. ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रवासात वा तिथे पोहोचल्यावर ते ध्यानात आले, तर संबंधित महिलेला परत पाठवण्यात येईल, असेही हज अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय हज सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-उर-रहमान यांनी हे आदेश दिले आहेत. अगोदरच ज्या महिलांनी पैसे भरले आहेत आणि त्या सध्या गरोदर आहेत, त्यांना पैसे परत घेऊन आपल्या सीट्स रद्द करण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बरेली हज समितीच्या सचिव नजीम बेग यांनी दिली आहे. हज येथे पहिले पाच दिवस खूप घाई गडबडीचे असतात. धावापळ करावी लागते, ते करताना दम लागण्याची शक्यता असते. पवित्र जागी फेऱ्या मारताना गरोदर महिलांना त्रास होतो. त्यामुळे असे ठरवण्यात आले, असे नजीम बेग म्हणाल्या. हज यात्रेच्या दरम्यान गरोदर महिलेला त्रास झाल्यास, तिची सर्व व्यवस्था समितीला करावी लागते. रुग्णालयात दाखल करण्यापासून उपचारांपर्यंतचा खर्चही समितीला करावा लागतो. ते करणे अवघड आणि काही वेळा अशक्य असते. त्यामुळे हज समितीने हा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्व केंद्रांना या सूचना देण्यात आल्या असून, हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये चार महिने पूर्ण झालेल्या गरोदर महिला असल्यास त्यांना हे कळवण्यात यावे, असे अता-उर-रहमान यांनी नमूद केले आहे.
हज यात्रेत गरोदर महिलांना बंदी
By admin | Published: April 09, 2016 12:34 AM