नवी दिल्ली : दादरी हत्याकांडामागे ‘पूर्वनियोजित कट’ असण्याचा संशय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने व्यक्त केला आहे. दादरी हत्याकांडाचे भांडवल करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये चिंताजनक असल्याचे आयोगाने म्हटले आहे.दादरीच्या बिशादा गावात गोमांस साठवून ठेवल्याच्या अफवेनंतर, जमावाने ५२ वर्षीय मोहंमद इकलाख या मुस्लीम व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली होती. बिशादा गावाला भेट दिल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर अल्पसंख्याक आयोगाने अप्रत्यक्ष टीका केली आहे. राजकीय नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे विविध समाजातील संबंध अधिक बिघडले. कोणत्याही परिस्थितीत हे आता थांबले पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.नसीम अहमद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या तीनसदस्यीय पथकाने बिशादा गावाला भेट दिल्यानंतर वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. ‘एका मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरून घोषणा झाल्यानंतर, एका मिनिटाच्या आत असंख्य लोक गोळा झाले आणि घटनेच्या वेळी आपण गाढ झोपेत होतो,’ असा दावा गावातील बहुतांश लोकांनी केला. यावरून इकलाखची हत्या पूर्वनियोजित कटाचाच भाग होती, असे दिसते. एका असहाय कुटुंबावर हल्ला करण्यासाठी एका विशिष्ट समाजाच्या लोकांना चिथावणी देण्याकरिता मंदिरासारख्या जागेचा वापर करण्यात आला, असे आयोगाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.इकलाखची हत्या हा केवळ एक अपघात होता, असे का सांगण्यात आले, हे समजत नाही आणि समजण्यासारखेही नाही. सरकारमधील काही अधिकाऱ्यांनीही या घटनेला एक अपघात म्हटले आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते महेश शर्मा यांनी दादरी हत्याकांड एक अपघात असल्याचे म्हटले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. (वृत्तसंस्था)
दादरी हत्याकांडामागे ‘पूर्वनियोजित कट’
By admin | Published: October 23, 2015 2:56 AM