शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- विरोधी पक्षांचा तीव्र विरोध आणि जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रेल्वे मंत्रालय आता प्रीमियम रेल्वेतील प्रवास भाडेवाढ योजना गुंडाळण्याची शक्यता आहे. ही योजना घोषित करून ७२ तास उलटत नाहीत, तोच रेल्वे मंत्रालयाने या योजनेला ‘ब्रेक’ लावण्याच्या दृष्टीने विचारविनिमय सुरू केला आहे. तथापि, उच्चपदस्थ सूत्रांनुसार रेल्वे मंत्रालय या योजनेला ‘ब्रेक’ लावण्यास राजी नाही.रेल्वे मंत्रालय ही योजना काही काळासाठी सुरू ठेवून फेरविचाराच्या नावावर पुढच्या महिन्यात ही योजना मागे घेण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वेमंत्रालयाने या यादीत अन्य कोणत्याही ट्रेनचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे मंत्रालयाने बुधवारी तडकाफडकी राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेचे प्रवासभाडे ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोधी पक्षांनी केलेला तीव्र विरोध आणि जनतेतूनही नाराजीचे सूर उमटल्यानंतर भाजपात खळबळ उडाली.पंजाब व उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर या निणर्याचा विपरीत परिणाम होईल. जनतेच्या नाराजीचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला भोगावा लागेल; हे ध्यानात घेऊन तेव्हा शक्य तेवढ्या लवकर या योजनांचा आढावा घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, असा स्पष्ट संदेश भाजप नेतृत्वाने रेल्वेमंत्री प्रभू यांना पाठविला. त्यानुसार या रेल्वेंच्या यादीत अन्य कोणत्याही ट्रेनचा तात्काळ समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच प्रवास भाडेवाढीची योजना मागे कशी घ्यायची, या दृष्टीने मंत्रालयाचे अधिकारी कामाला लागले आहेत.>निर्णय कसा घेणार?या योजनेतून मिळणाऱ्या ५०० कोटींच्या उत्पन्नाची रेल्वे मंत्रालयाला चिंता आहे. ही योजना गुंडाळावी म्हणून रेल्वेमंत्रालयावर दडपण असले तरी रेल्वे मंत्रालय हा निर्णय केव्हा मागे घेणार, हे अद्याप स्पष्ट नाही.