नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरात गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे. दहशतवाद्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत काही दिवसांतच 7 नागरिकांचा बळी घेतला. यानंतर काश्मीरपासून ते नवी दिल्लीपर्यंत खळबळ उडाली. या दहशतवादी घटनांमागे पाकिस्तानचा हात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. काश्मीर प्रश्नासंदर्भात सुरू असलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि अजित डोवाल यांच्यात ही बैठक काश्मीर आणि सीमावर्ती भागांच्या मुद्द्यावर होत आहे. यात डोवाल पीएम मोदींना यासंबंधीची माहिती देत आहेत. अलीकडेच दहशतवादाच्या मुद्यावर गृह मंत्रालयातही एक महत्वाची बैठक झाली. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात नव्याने आघाडी उघडण्यात आली आहे.
एकाच दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा -काश्मिरात दहशतवादी घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्यानंतर लष्कराने खोऱ्यात ऑल आउट ऑपरेशनला आणखी गती दिली आहे. गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू -काश्मिरात 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात, अलीकडेच सामान्य नागरिकांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे.पाच जवानांनाही हौतात्म्य -दुसरीकडे, जम्मू -काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात माहिती मिळाताच लष्कराच्या जवानांनी कारवाईला सुरुवात केली. जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते. मात्र यावेळी दहशतवाद्यांच्या भ्याड गोळीबारात जेसीओसह पाच जवानांना हौतात्म्य आले. सूबेदार जसविंदर सिंग, नायक मनदीप सिंग, सिपाही गज्जन सिंग, सरज सिंग आणि केरळचे वैशाख एस, अशी हौतात्म्य आलेल्या जवानांची नावे आहेत.