लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोठा दावा केला आहे. संसदेत दिलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर ईडी आपल्यावर छापा टाकण्याची तयारी करत असून ईडीतील काही लोकांनी आपल्याला ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता देशाचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. टू इन वनला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही, हे जाहीर आहे. ईडीतील काही लोकांनी मला सांगितलेय की छापे टाकण्याची योजना बनविण्यात येत आहे. मी ईडीची वाट पाहत आहे, चहा, बिस्कीट माझ्याकडून त्यांना मिळेल, असे राहुल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. पहाटे २ च्या सुमारास हे ट्विट करण्यात आले आहे.
लोकसभेतील केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाषणावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला होता. देशातील शेतकरी, मजूर, तरुण घाबरलेले आहेत. कमळाच्या प्रतिकृतीवरून टीका करताना मोदी यांनी २१ व्या शतकात नवीन चक्रव्यूह बनविले असल्याचे म्हटले होते. या भाषणावरून राहुल यांनी आपल्यावर ईडी कारवाईची तयारी केली जात असल्याचा दावा केला आहे.
जे चक्रव्यूह बनविले आहे, त्यामुळे करोडो लोकांचे नुकसान झाले आहे. आम्ही त्या चक्रव्यूहाला तोडणार आहोत. ते तोडण्याचे सर्वात अस्त्र म्हणजे जातीय जनगणना आहे. यापासून तुम्ही सर्व घाबरत आहात. इंडिया आघाडी गॅरंटीने कायदेशीर एमएसपी पास करेल. याच सदनात आम्ही जाती जनगणना पास करून दाखविणार, असे राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर मोठे राजकारण रंगले होते. भाजपच्या मंत्र्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता संसदेत ज्यांना त्यांची खरी जात माहिती नाही ते जातीवर बोलतात, असा टोला लगावला होता. यावरून काँग्रेस भडकली होती. आंदोलनेही करण्यात आली होती.