सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच शिंदे गटाने गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बैठक सुरु केली आहे. यामध्ये पुढील रणनीती आखली जाणार आहे. याचबरोबर ठाकरे सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्यावरही चर्चा केली जात आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाची कोअर कमिटीची बैठक सुरु होत आहे. या बैठकीत देखील भाजपाच पुढील खेळी काय असले यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे गट राज्यपालांकडे ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदे गट मुंबईत येणार की त्यांचे प्रतिनिधी येणार हे अद्याप ठरलेले नाही. शिवसेनेने आमदार मुंबईत आले तर ते आपल्याबाजुने येतील असे म्हटले आहे. तर शिंदे गटाने ठाकरे सरकारचे समर्थन काढल्याचे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज बंडखोर आमदारांना दिलासा दिला. १२ जुलैपर्यंत आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाहीय. परंतू, शिंदे गट किंवा भाजपा ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. यावर न्यायालयाने बंदी घातलेली नाही. परंतू, जर एखादा पक्ष या फ्लोअर टेस्टविरोधात आपल्याकडे दाद मागण्यासाठी आल्यास आम्ही तात्काळ त्याची दखल घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे.
आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलै ५.३० पर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे.