भाजपा व काँगे्रसविरोधी आघाडीची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:33 AM2018-03-06T01:33:09+5:302018-03-06T01:33:09+5:30
तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.
हैदराबाद - तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.
देश पातळीवर काँग्रेसेतर व भाजपेतर पर्यायाची गरज असल्याचे त्यांचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. हे काही घाईत टाकलेले पाऊल नाही. राव यांची वक्तव्ये ही गांभीर्याने घेण्याची गरज टीआरएसच्या नेत्यांनी बोलून दाखवली. प्रादेशिक पक्षांना एका व्यासपीठावर आणावे ही कल्पना राव यांच्या डोक्यात आहेच, असे सांगून टीआरएसचा नेता म्हणाला की, काँग्रेस व भाजपसारख्या मोठ्या पक्षांसोबत काम करतानाचा प्रादेशिक पक्षांचा अनुभव फारसा चांगला नाही, या निष्कर्षाला केसीआर आले आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील मोठे राजकीय पक्ष त्यांच्या आघाडीतील भागीदार पक्षांशी फारच थोडा समन्वय राखतात, असा अनुभव आहे. हा मुद्दा महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीत सुरू असलेल्या तणावातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष व भाजपा यांच्या नात्यात निर्माण झालेल्या तणावातून स्पष्ट होईल, असे राव म्हणाल्याचे समजते. (वृत्तसंस्था)
सुरुवातीला आघाडी, नंतर एकजूट
या तणावांना पूर्णविराम देण्यासाठीच राव प्रादेशिक राजकीय पक्षांना एकत्र बांधण्याची योजना तयार करीत आहेत. धर्मनिरपेक्ष विचारांच्या प्रादेशिक समविचारी पक्षांना सामाजिक न्यायाच्या समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचा आमचा हेतू आहे, असे खा. बी. विनोद कुमार म्हणाले. सुरुवातीला राजकीय पक्षांची असे त्याचे स्वरूप दिसेल, पण नंतर ते एकत्र आल्याचे दिसेल, असेही त्यांनी सांगितले.