२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:01 AM2023-07-13T06:01:57+5:302023-07-13T06:02:57+5:30

पराभूत १६० जागांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यात अनेक केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांनी सहभाग नोंदवला

Preparations for 2024 are underway but BJP is worried about 160 seats; Will emphasize in Maharashtra | २०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

googlenewsNext

संजय शर्मा

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागा आता जिंकण्यासाठी भाजपने या लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ व दिग्गज नेत्यांना उतरवून जिंकण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. खासदारांना मतदारसंघात प्रवास व रात्रीचा मुक्काम करण्याचेही निर्देश दिले आहेत. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वांत जास्त चिंता १६० जागांची असून, याच ठिकाणी २०१९मध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या जागांवर भाजपने आपले दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री व खासदारांना पाठवून निवडणूक जिंकण्याची जबाबदारी दिली होती.

या जागांसाठी नियुक्त केलेल्या नेत्यांसमवेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आजवर पाचपेक्षा जास्त बैठका झालेल्या आहेत. आजही या पराभूत १६० जागांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यात अनेक केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांनी सहभाग नोंदवला. या जागांची जबाबदारी घेणाऱ्या नेत्यांनी स्थानिक समीकरण, भाजपचा कमकुवतपणा ही कारणे पक्षनेतृत्वासमोर ठेवली आहेत. या नेत्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक समीकरण बदलताच तेथे विजय सुनिश्चित होईल. पक्षाचे संघटन अशा काही जागांवर काही राज्यांत कमकुवत आहे. दक्षिणेकडील राज्यांत भाजपचा कमकुवतपणा स्पष्ट दिसत आहे. युती करून तेथील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्रात जोर लावणार
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २५ जागा भाजपने लढवल्या होत्या. त्यापैकी २३ जागांवर विजय प्राप्त केला होता. राज्यातील पराभूत झालेल्या दोन जागा जिंकण्यासाठी ताकद लावली जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्रातील बारामतीची जागा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात नवीन समीकरण निर्माण झाल्यानंतर आता कोणताही निर्णय घेताना भाजपला राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाला बरोबर घ्यावे लागणार आहे.

१८ जुलै रोजी एनडीएचे नवे रूप दिसणार
१८ जुलै रोजी दिल्लीच्या हॉटेल अशोकामध्ये एनडीएची मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, यात नवीन मित्रपक्ष सहभागी होतील. यावेळी एनडीएचे नवे रूप समोर येईल. शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, अकाली दलाचे सुखबीर बादल, सुभास्पाचे ओमप्रकाश राजभर या बैठकीत सहभागी होऊ शकतात.

कुठे असेल भर?
पश्चिम बंगालच्या २४ जागा आहेत. त्या ठिकाणी भाजपचा कमकुवतपणा अद्यापही कायम आहे. आजही पंचायत निवडणुकीत भाजपचा बंगालमध्ये पराभव झाला आहे. मध्य प्रदेशातील एकमेव छिंदवाडा मतदारसंघात भाजपला अनेक वर्षांपासून पराभव पत्करावा लागत आहे. उत्तर प्रदेशच्या १८ जागांची अशीच स्थिती आहे.
 

Web Title: Preparations for 2024 are underway but BJP is worried about 160 seats; Will emphasize in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.