४८ जागांवर लोकसभेची तयारी, पण...; नाना पटोलेंनी सांगितला दिल्ली बैठकीचा वृत्तांत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 06:34 PM2023-07-11T18:34:45+5:302023-07-11T18:40:59+5:30
महाराष्ट्र राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवरील चर्चा बैठकीत झाली, या बैठकीला राज्यातील २५ नेते उपस्थिते होते.
मुंबई - भाजपानंतर आता काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक ४८ लोकसभा सीट असलेलं राज्य आहे. त्यामुळे, राष्ट्रीय पक्षांची नजर महाराष्ट्रावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची आज राजधानि दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल तसेच राहुल गांधी देखील या बैठकीत हजर होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा आणि काही मह्त्त्वाचे निर्णय झाले.
महाराष्ट्र राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवरील चर्चा बैठकीत झाली, या बैठकीला राज्यातील २५ नेते उपस्थिते होते. बैठकीचा वृत्तांत सांगताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही राज्यातील लोकसभेच्या ४८ जांगासाठीची तयारी करत आहोत. मात्र, आघाडीचा निर्णय झाल्यानंतर जागावाटपात ज्या पक्षासाठी जागा जाईल, तेथील पक्षाच्या उमेदवाराल आमचा पाठिंबा राहिला. आमच्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे, मदतीमुळे संबंधित उमेदवाराला निवडणूक सोपी होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, येथील जनतेच्या मनात शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आहे. त्यामुळे, जो कोणी उमेदवार असेल त्यांस आमचा फायदाच होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र में जब भी चुनाव होगा कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनकर सामने आएगी।
— Congress (@INCIndia) July 11, 2023
हम महाराष्ट्र में एक बस यात्रा निकालेंगे और मोदी सरकार ने कैसे डर पैदाकर महाराष्ट्र की विचारधारा को खरीदने का काम किया है- ये बात जनता को बताएंगे।
: महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री @NANA_PATOLEpic.twitter.com/IQTN7YjONt
महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर पक्ष संघटना वाढीसाठी काम करण्यात येणार आहे. तसेच, पावसाळा संपल्यानंतर काँग्रेसच्यावतीने बस यात्रा काढण्यात येणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या आणि राज्यात तीन-तिघाडा बनललेल्या सरकारमध्ये कशारितीने खोक्यांचा वापर केला हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले, बेरोजगारी वाढली आहे, महागाईही वाढली आहे. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ. तसेच, भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते हेही लोकांना सांगू, असे नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितले.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
या बैठकीचा फोटो शेअर करत खर्गे यांनी ट्विट केले की, “भाजपने वॉशिंग मशीन वापरgन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचे काम केले आहे. या राजकीय खेळाला काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देईल. भाजपकडून जनादेशावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड राजकीय उत्तर देईल.आमचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे सरकार परत मिळवून देतील. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही आमचे स्थान टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेस यांच्यातील वैभवशाली नाते आम्ही आणखी दृढ करू."