हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा आणि इतर राज्यांत ५० विधानसभा तसेच लाेकसभेच्या काही जागांसाठी पाेटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयाेग जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा व इतर राज्यांतील पाेटनिवडणुकीसाठी देखील तयारी करीत आहेत.
सध्या २३१ सदस्य संख्या असलेल्या वरिष्ठ सभागृहात भाजपचे ९५ सदस्य आहेत. या सभागृहात १२ जागा रिक्त असून, यात जम्मू-काश्मीरमधून ४, आंध्र प्रदेशातून ४, नामनिर्देशित सदस्यांच्या ४ तर ओडिशा आणि हरयाणातून प्रत्येकी एक जागांचा समावेश आहे. वायएसआर काँग्रेसचे दोन आणि बिजदच्या एका सदस्याने राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. त्यापैकी बिजद सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या ४ जागांचे गणित
जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्यातील राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होईल. यात नॅकाँ व काँग्रेस युतीस तीन जागांवर विजय अपेक्षित आहे. यामुळे सभागृहातील काँग्रेस-माकप व आप तसेच इतर ५ अपक्ष, अशी या आघाडीची संख्या ५५ पर्यंत जाऊ शकते. यात भाजपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
यांना संधी मिळण्याची शक्यता
- नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता.
- भाजपकडून माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंह आणि कविंदर गुप्ता यांच्यापैकी एकास संधी मिळेल.