संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे.
मोदी सरकारच्या सर्व मंत्र्यांसह देशातील अनेक मान्यवर, अनेक देशांचे राजदूत, उच्चायुक्त, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. २८ मे रोजी मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी दोन दिवस आधी संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व खासदार, सर्व माजी लोकसभा अध्यक्ष यांना निमंत्रण देण्यात आले आहे. संपूर्ण संसद भवन फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात येत आहे. जुने संसद भवन देखील सजवण्यात येत आहे.
मोदींचे काम काँग्रेसला पाहवले जात नाही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी नवीन संसद भवनावर केलेल्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणतेही काम या लोकांना पाहवले जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन असल्याने ही अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान मोदी देशातील १४० कोटी लोकांचे प्रतिनिधी आहेत. देशातील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. अशा प्रश्नांनी, तर काँग्रेसच्या नेत्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.