कोणत्याही चौकशीला तयार; पण ‘राफेल’चाही तपास करा, राहुल गांधी यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:45 AM2019-05-05T06:45:52+5:302019-05-05T06:46:46+5:30

यूपीएच्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष असे वाक्युद्ध सुरू झाले आहे.

Prepare any inquiries; But also investigate 'Rafale' -Rahul Gandhi | कोणत्याही चौकशीला तयार; पण ‘राफेल’चाही तपास करा, राहुल गांधी यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर

कोणत्याही चौकशीला तयार; पण ‘राफेल’चाही तपास करा, राहुल गांधी यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर

Next

 नवी दिल्ली : यूपीएच्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष असे वाक्युद्ध सुरू झाले आहे. ‘‘या प्रकरणात मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, पण सोबतच राफेल प्रकरणाचीही चौकशी करा,’’ असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.

यूपीएच्या काळात राहुल गांधी यांचे व्यावसायिक पार्टनर उलरिक मॅकनाइट यांचा संबंध असलेल्या बॅकॉप्स लिमिटेडला संरक्षणासंदर्भात कंत्राट मिळाल्याचे वृत्त एका इंग्रजी नियतकालिकाने प्रसिद्ध केले होते. त्याचा हवाला देत अमित शहा यांनी टिष्ट्वट करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ‘‘राहुल गांधी यांचा परिसस्पर्श झाल्यास कोणतेही कंत्राट अवघड नाही. त्यात भारताचे कितीही नुकसान झाले तरी हरकत नाही.’’

या टिष्ट्वटला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘‘या संदर्भात मी कोणत्या प्रकारच्या तपासाला, चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. कारण मला माहितेय, मी गैरप्रकार केलेला नाही. पण ही चौकशी करतानाच राफेल प्रकरणाचीही चौकशी करा.’’

सत्याच्या लढाईत मोदींचा पराभव निश्चित - राहुल
मोदींचा पराभव होणार हा देशाचा आवाज आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते शक्यही होते. मात्र आज देशात मागील ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. त्यांचे १५ लाखांचे आश्वासनदेखील जुमला ठरले. ही लढाई सत्याची आहे. आमच्या बाजूने सत्य आहे. त्यामुळे मोदींचा पराभव होणार आहे.

अनिल अंबानी यांचे घर सोडून कुठेही चर्चेस तयार
मी खुले आव्हान देतो की, मोदींनी माझ्यासमोर चर्चेला बसावे. अनिल अंबानी यांचे घर वगळता, ते सांगतील त्या ठिकाणी येऊन मी चर्चा करायला तयार असल्याचा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

मसूदला सोडणारे भाजपच; मोदींनी त्याचे उत्तर द्यावे
मसूदला अतिरेकी घोषित करण्याच्या घोषणेमुळे काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे वक्तव्य मोदींनी केले होते. त्याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ज्या मसूदवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

‘करारासाठी मदत करणारे पंतप्रधान होऊ पाहताहेत’

नवी दिल्ली : संरक्षण करारासाठी मदत करणारे आता पंतप्रधान होऊ पाहत आहेत, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांना लगावला. ते म्हणाले, कोणत्याही कंपनीशी संबंध नसणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी कोणताही पुरवा नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करतात. जो व्यवहार कॅगने आणि सुप्रीम कोर्टानेही योग्य ठरवला त्यावरून रान उठवले जात आहे. आता तर राहुल गांधी यांचा व्यावसायिक मित्राच्या कंपनीला संरक्षण करार देण्यात प्रत्यक्ष सहभाग दिसत आहे, आता त्यांच्याबाबत कोणता न्याय करायला हवा?

Web Title: Prepare any inquiries; But also investigate 'Rafale' -Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.