संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या नोटीशीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. मोदींनीच काँग्रेसला याची तयारी करायला सांगितली होती, असे या व्हिडीओतून समोर येत आहे.
खरेतर मोदींविरोधात काँग्रेसने २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावेळी सभागृहात बोलताना मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला होता. यावेळी 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची संधी मिळावी यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो, असे मोदी म्हणाले होते.
यानंतर मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 400 वरून जवळपास 40 पर्यंत घसरल्या हा अहंकाराचा परिणाम असल्याचे काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. याचबरोबर भाजपने दोनपेक्षा जास्त जागांवर स्वबळावर सत्तेवर पोहोचणे हे सेवेच्या भावनेचेच फलित असल्याचे पीएम मोदी म्हणाले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने मोदींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसने मोदी सरकारविरोधात दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रस्तावाची नोटीस मंजूर केली आहे. यानंतर भाजपाचे पदाधिकारी अमित मालविया यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.