संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीमध्ये जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढल्यानंतर आता संघटन स्तरावर मोठ्या फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत राज्यांमध्ये व भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये मोठे बदल दिसून येतील.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर आता सार्वत्रिक निवडणुका व ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. तथापि, आताही म्हटले जात आहे की, मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल व भाजपमधील संघटन स्तरावरील बदल एकाचवेळी केले जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन लोकसभेच्या एकेका जागेबाबत बदल करीत आहेत. राज्यांमध्येही राजकीय निर्णयांबाबत प्रदेशांच्या टीमला निवडणूक मोडमध्ये आणायचे आहे.
काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार
जे. पी. नड्डा कार्यकाळ वाढल्यानंतर आपली टीम तयार करतील. याच टीमच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा व ९ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढल्या जातील. मोदी सरकारचे काही केंद्रीय मंत्री भाजप संघटनेत पाठविण्याची चर्चा सुरू आहे.
तीन राज्यांकडे सर्वांच्या नजरा
- यंदा विधानसभा निवडणुका होणाऱ्या राजस्थान, छत्तीसगढ व मध्य प्रदेशकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना पर्याय शोधला जात आहे; परंतु ते ओबीसी असल्यामुळे पर्याय ओबीसी असावा की, अन्य कोणी, यावर चर्चा सुरू आहे.
- राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्यासाठी पक्षाने कोणती भूमिका निश्चित केली आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या जनआक्रोश यात्रा निघाल्या आहेत. परंतु वसुंधरा राजे या यात्रांपासून दूर राहिल्या आहेत.